इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार

Sunil Gajakosh11 months ago282 Views

बाळासाहेब ठाकरे डिजिटल चरित्राच्या पोस्टरचे अनावरण

मुंबई : दैनिकातील पूर्णवेळ व्यंगचित्रकार ते एका बलाढ्य राजकीय संघटनेचे सर्वेसर्वा; ‘मार्मिक’कार ते शिवसेनाप्रमुख असा प्रवास करत साठोत्तरी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या इतिहासाला निर्णायक वळण देणारे कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते कीर्तिकुमार शिंदे लिखित ‘मातोश्री’ निवासस्थानी ‘इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार’ या डिजिटल चरित्राच्या पोस्टरचं अनावरण झालं. या पोस्टरमध्ये वापरण्यात आलेलं व्यंगचित्र हे बाळासाहेबांनीच, शिवसेनेची स्थापना करण्यापूर्वी, ते व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’चे संपादक असताना (१९६०) रेखाटलं होतं.

कीर्तिकुमार शिंदे

हिंदूह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वादळी व्यक्तिमत्वावर आधारीत असे ‘इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार’ हे आगळं-वेगळं डिजिटल चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी लिहिलेलं हे चरित्र डिजिटल माध्यमात प्रसिद्ध होणार असून त्यात बाळासाहेबांची व्यंगचित्रकार म्हणून झालेली जडण-घडण, त्यांच्यावरचे कलात्मक व राजकीय प्रभाव, त्यांनी काढलेली ऐतिहासिक व्यंगचित्रं, त्यांच्या व्यंगचित्रकलेची वैशिष्ट्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ‘मार्मिक’कार ते शिवसेनाप्रमुख हा त्यांचा अदभूत प्रवास यांबाबतची अत्यंत दुर्मीळ आणि रंजक माहिती असणार आहे.

“बाळासाहेबांचं ‘मार्मिक’मधलं लेखन, त्यांनी चितारलेली व्यंगचित्रं, त्या काळातील जुनी छायाचित्रं आणि व्हिडिओ तसंच इतर महत्वाच्या अभ्यासकांचं लेखन व मुलाखती यांच्या आधारे हे चरित्र घटना- किस्से- गोष्टीरूपात मी मांडलं आहे. वाचकांना साठ- सत्तर- ऐंशीच्या दशकातील काळ हा व्यंगचित्रं, छायाचित्रं- दृश्यरूपात पाहता यावा यासाठीच हे चरित्र डिजिटल माध्यमात क्रमवार प्रसिद्ध करण्याचं ठरवलं” असं कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितलं.

0 Votes: 0 Upvotes, 0 Downvotes (0 Points)

Loading Next Post...
Follow
Search Trending
Popular Now
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...