
शिवसेना ही मराठी भूमिपुत्रसमर्थक, संकुचित महाराष्ट्रवादी, परप्रांतीयद्वेष्टी, पण हिंदुत्ववादी अशी आक्रमक, तोडफोड करणारी, मारहाण करणारी संघटना असल्याचं अनेक विचारवंतांनी, लेखकांनी नमूद केलेलं आहे. विशेषत: साठ-सत्तर-ऐशीच्या दशकातील इंग्रजी अभ्यासकांच्या पुस्तकांमध्ये हीच मांडणी आढळते. त्यासाठी अनेक पुरावेही दिले गेलेत. दुसरीकडे, शिवसेना ही मराठी माणसांत बंधुभाव जपणारी, जात धर्म भाषा न पहाता कुणाच्याही मदतीला धावून जाणारी आणि उत्स्फूर्तपणे सामाजिक सहकार्य करणारी संघटना असल्याची मांडणीही काहींनी, विशेषत: शिवसेनेबाबत मनात एक हळवा कोपरा असलेल्या पत्रकार-लेखकांनी केली आहे. तुमच्या आसपास राहणा-या, सुशिक्षित-नोकरदार पण बुद्धिजीवी नसलेल्या सर्वसामान्य मराठीजनांकडून शिवसेनेच्या कुटुंब भावनेबाबत किंवा बंधुभावाबाबत तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. नाण्याच्या या दोन्ही बाजूंचा विचार करताना शिवसेना म्हणजे नेमकं काय? शिवसेना म्हणजे फक्त मराठी माणूस; शिवसेना म्हणजे परप्रांतीयांचा द्वेष; की आणखी काही? हे प्रश्न आपोआपच उपस्थित होतात .

शाखेने जोडलेला त्रिकोण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रकला- वक्तृत्व- करिष्म्यामुळे मराठी माणूस शिवसेनेकडे आकर्षित झाला हे खरंच, पण स्थानिक पातळीवरच्या शाखाप्रमुखांनी आपल्या परिसरातल्या सर्वसामान्य मराठी माणसाला (आणि इतर भाषिकांनाही) मोठ्या कौशल्याने वर्षानुवर्षं संघटनेशी जोडून ठेवलं, हेसुद्धा तितकंच महत्वाचं. शिवसेनाप्रमुख, शिवसैनिक आणि मराठी माणूस (सर्वसामान्य जनता) या त्रिकोणाला एकमेकांशी घट्ट बांधून ठेवण्याचं काम झालं ते शाखेत.
बंडखोरी काही शिवसेनेला नवीन नाही. अगदी सुरुवातीला हेमचंद्र गुप्ते, बंडू शिंगरे यांच्यापासून, नंतर छगन भुजबळ यांच्यापासून राज ठाकरेंपर्यंत आणि नारायण राणेंपासून एकनाथ शिंदेपर्यंत अनेक प्रतिष्ठित शिवसेना नेत्यांनी, तसंच तीन-चार वर्षांपूर्वी खासदार- आमदार- जिल्हाप्रमुख- नगरसेवक- शाखाप्रमुख- अशा अनेकांनी पक्षसंघटनेला सोडचिठ्ठी दिली, तरी शिवसेना काही संपत नाही. ठाकरे काही झुकत नाहीत. हे सगळं कशाच्या जोरावर? मला वाटतं, फक्त आणि फक्त शाखेच्या जोरावर!
‘आमची शाखा सर्वत्र’ या लेखमालेत आपण शाखा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेच्या शाखा संस्कृतीची तपशीलवार चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी पताकावरच प्रकाशित झालेला- ‘मार्मिक’चा वाचक ‘शिवसेना भक्त’ होण्यास सुरुवात झाली- हा लेख वाचायला विसरु नका.

शाखा आणि शाखाप्रमुख : इतिहास
५ जून १९६६ च्या मार्मिक अंकात शिवसेना स्थापन होणार असल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर १२ जून १९६६ च्या मार्मिक अंकात “ठिकठिकाणी ‘शिवसेना’ प्रमुख नेमणे जरुरीचे आहे. जबाबदार कार्यकर्त्यांनीच समक्ष भेटावे.” असं आवाहन करण्यात आलं. या आवाहनानंतर ठाकरेंनी दिलेल्या पत्त्यावर- ७७ ए रानडे रोड, शिवाजी पार्क, मुंबई-२८ येथील त्यांच्या निवासस्थानी रीघच लागली. हे सगळं शिवसेनेची औपचारिक स्थापना होण्याआधीचं, बरं का? समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना आपापल्या भागात शिवसेना हवी होती. मार्मिकमधील प्रबोधनकारांचे लेख आणि बाळासाहेबांची व्यंगचित्रं यांमुळे ठाकरेंची संघटना कोणत्या विचारांची असेल याची पूर्ण कल्पना मार्मिकच्या वाचकांना होतीच. या काळात मार्मिकचे संपादक, जे आता लवकरच शिवसेनाप्रमुख होणार होते, शिवसैनिकासाठी ‘शिवसेना भक्त’ किंवा ‘शिवसेना सैनिक’ आणि शाखाप्रमुखासाठी ‘ठिकठिकाणचे शिवसेना प्रमुख’ अशी नावं वापरली जात होती. संघटनाच स्थापन झाली नव्हती तर संघटनेच्या पदनामावली कशी निश्चित असणार?
‘शिवसेनेची शाखा’ हा शब्द पहिल्यांदा अवतरला- वाचला गेला तो १७ जुलै १९६६ च्या मार्मिक अंकात. या अंकातल्या ‘रविवारची जत्रा’खाली बाळासाहेबांनी एक पट्टी टाकली. ती अशी-

‘शिवसेने‘च्या शाखा : स्थानिक जनतेने येथे चौकशी करावी.
ठाणे : डॉ. विजय स. ढवळे,
बेडेकर हॉस्पीटल, नौपाडा, ठाणे.
टेलि. ५९२७९७ – ५९१४३८
विलेपार्ले : ‘विसपुते’
मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स, गुजराती सोसायटी, नेहरू रोड, विलेपार्ले, मुंबई ५७.
डोंबिवली : गोपाळ लक्ष्मण मोकाशी,
मनिषा पब्लिसिटी,
डोंबिवली, जिल्हा ठाणे.
२४ जुलै १९६६ च्या मार्मिक अंकात,
‘शिवसेने‘च्या शाखा : स्थानिक जनतेने येथे चौकशी करावी.
गोरेगांव, अनिल विठ्ठल कुलकर्णी,
मंजुळा निवास, खो.नं.२, टोपीवाला वाडी, स्टेशन रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई ६२
प्रभादेवी, खरुडे निवास,
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, प्रभादेवी नाका, मुंबई नं. २८.
टे. नंबर- ४५३२१२.
२१ ऑगस्ट १९६६ च्या मार्मिक अंकात,
‘शिवसेने’च्या शाखा : स्थानिक जनतेने येथे चौकशी करावी.
चिंचपोकळी, चिंचपोकळी सेवा मंडळ,
साने गुरुजी पथ, (लक्ष्मीनारायण देवळाजवळ), मुंबई ११.
अभ्युदयनगर, श्री. निळकंठ बावकर,
C/o विश्वनाथ बाबाजी राणे,
७/५३५ अभ्युदय नगर, मुंबई ३३.
विक्रोळी (पश्चिम), श्री. अविनाश अष्टपुत्रे,
ए-११/३, पार्क साइट,
वठठराव चोगळे नाळ,
विक्रोळी (पश्चिम).
बोरिवली (पश्चिम), श्री. चंद्रकांत शंकर मोकाशी,
वसंतराव चोगळे चाळ,
बाभई, बोरिवली (पश्चिम).
डिलाईल रोड, श्री. त्रिंबक झिपरू पाटील,
स्टार ऑफ महाराष्ट्र लायब्ररी,
सिंगापूरवाला चाळ, डिलाईल रोड (पोलिस स्टे. जवळ), मुं. १३
२१ ऑगस्ट १९६६ च्या याच मार्मिक अंकात मागच्या पानावर आणखी एक चौकट होती. या चौकटीत ‘शिवसेना शाखा प्रमुख’ हा शब्द पहिल्यांदा अवतरला. ती चौकट –
शिवसेना शाखा प्रमुखांना विनंती :
येत्या २१ तारखेला, रविवारी सकाळी ९ वाजता, ‘शिवसेने’चा पुढील कार्यक्रम आखण्यासाठी बैठकीस न चुकता हजर रहावे. त्याचबरोबर सेनेचे तक्ते घेऊन यावे.
– बाळ ठाकरे.
जागा – रामदास प्रेसच्याशेजारी, ‘मार्मिक’ कचेरी, ब्राह्मण सहाय्यक संघासमोर, दादर.
… अशा पद्धतीने पुढच्या अंकांमध्येही नवनवीन शाखांचे पत्ते येत गेले. १९ सप्टेंबर १९६६च्या अंकात व्यंगचित्रकार प्रल्हाद कुळकर्णी यांनी कोल्हापुरात, राम सामरे यांनी वांदरा (पूर्व) येथे, तर धारावीत शिंदे ब्रदर्स यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या शाखांचे पत्ते प्रसिद्ध झाले. पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की, या सर्व शाखा शिवसेनेची पहिली जाहीर सभा होण्याअगोदरच स्थापन झाल्या होत्या. हासुद्धा एक चमत्कारच म्हणायला हवा. व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकने घडवलेला चमत्कार!
हे सगळं ‘पताका’च्या वाचकांना सविस्तरपणे सांगायचं कारण इतकंच की, नव्या पिढीतल्यांना त्या काळचा फील यावा आणि जुन्या पिढीतल्यांचं स्मरणरंजन व्हावं. तर आता पुढच्या लेखात आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळू.